Ayurved · Health

गहू – आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

*गहू – आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून*

 

गेले काही दिवस सोशियल मीडिया वरून गव्हावर उलट सुलट चर्चा वाचनात आली. त्यातील बऱ्याच पोस्टमध्ये गहू खाणे कसे चूक आहे हे सांगून गहू पूर्णपणे वर्ज्य करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. हे मत अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विल्यम डेव्हिस यांनी मांडलेले आहे असा  यातील बऱ्याच पोस्ट मध्ये उल्लेख आहे. अमेरिकेतून आलेली कोणतीही गोष्ट भारतात किती शिरसावंद्य असते हे वेगळे सांगायला नको.

         आता मूळ मुद्यावर येऊया.

१) गहू खाल्ल्याने रक्तातील साखर अत्यंत वेगाने वाढते असे लेखात म्हटले आहे. 

*सत्य* – कुठल्याही कार्बोहायड्रेट मधील साखर वाढण्याची क्षमता ठरवण्यासाठी Glycemic Index (GI) या एककाचा वापर केला जातो. कोणताही पिष्टमय पदार्थ खाल्यापासून पुढील 2 ते 3 तासात रक्तातील साखर किती प्रमाणात वाढली हे Glycemic index (GI) आपल्याला सांगतो. गव्हापासून बनवलेल्या ब्रेडचा GI 67 आहे तर पांढऱ्या तांदळापासून केलेल्या भाताचा GI 68 आहे. याचाच अर्थ गहू व तांदूळ यांच्या GI value मध्ये विशेष फरक नाही असे असताना रक्तातील साखर वाढवण्यासाठी फक्त गव्हाला दोषी ठरवणे एकांगी आहे. गंमत म्हणजे ज्या कॉर्न फ्लेक्स चा हेल्दी म्हणून उदो उदो केला जातो त्याचा GI तब्बल 92 आहे.

      आयुर्वेदात मधुमेहाला कारणीभूत आहारामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, दही, गुळापासून बनवलेले पदार्थ, अतिरिक्त मांसाहार ( विशेषतः मासे), नवीन असलेले कोणतेही धान्य यांचा उल्लेख केलेला आहे. यासोबतच कफ वाढवणारी सर्व कारणं मधूमेह उत्पन्न करू शकतात. गव्हाने कफ वाढतो हे खरे आहे पण गव्हापासून केलेल्या ब्रेडने जेवढा कफ वाढेल तेवढा घरात केलेल्या पोळीने नक्कीच नाही. *एकाच धान्यापासून केलेली पोळी किंवा भाकरी जर गोवऱ्यांवर, खापरावर, मातीच्या मडक्यात, लोखंडी तव्यावर आणि डायरेक्ट निखाऱ्यावर भाजली तर ती पचायला अधिकाधिक हलकी होते.* म्हणजेच गोवऱ्यांवर भाजलेली पोळी पचायला सर्वात जड , त्यानंतर खापराची पोळी, नंतर माठावर भाजलेली, मग लोखंडी तव्यावरची आणि सगळयात हलकी डायरेक्ट निखऱ्यावरची असा हा क्रम आहे. सहसा सर्व मराठी घरांमध्ये लोखंडी किंवा धातूच्या तव्यावर पोळ्या केल्या जातात म्हणून त्या पचायला हलक्या होतात आणि कफाला विशेष वाढवत नाहीत. त्यामुळे तव्यावर भाजलेला गव्हाचा फुलका पचायला हलका असतो. पण पुरणपोळी, पुरी,चीझने रापलेले पराठे, फ्रँकी हे प्रकार पचायला जडच आहेत. म्हणूनच आपल्याकडे पुरणपोळी कधीतरी  सणाला केली जाते.

2) गव्हाचे आयुर्वेदातील सर्वोत्तम ग्रंथ चरक संहितेत काय गुणधर्म सांगितले आहेत ते पाहूयात.

*सन्धानकृत वातहरो गोधूम: स्वादु शीतल: l*

*जीवनो बृंहणो वृष्य: स्निग्ध: स्थैर्यकरो गुरू:ll* 

गहू हा चवीला गोड, पचायला जड, थंड प्रकृतीचा, स्निग्ध, वाताला कमी करणारा, शरीराला स्थिर करणारा, शुक्रधातू वाढवणारा आणि जखम तसेच हाडांचे फ्रॅक्चर भरून आणणारा आहे. 

       गहू वर्षभर घरात साठवून 

वापरले कि त्यांची कफ वाढवण्याची प्रवृत्ती बऱ्याच प्रमाणात कमी होते.

      त्यामुळे पचायला थोडा जड  असला तरी शरीराला स्थैर्य देणारा, शुक्र धातू वाढवणारा, हाडांना बळकट करणारा गहू आहारातून पूर्णपणे वगळणे चूक आहे. चरकांनी *नित्य सेवनीय द्रव्य* अर्थात नेहमी खाण्यायोग्य पदार्थ म्हणून गव्हाचा उल्लेख केलेला आहे. आठवड्यात आपण 14 वेळी जेवतो त्यामध्ये 5 – 6 वेळा गहू खाणे चुकीचे नाही आणि रात्रीच्या जेवणात शक्यतो ज्वारी, बाजरी, नाचणी यांची भाकरी खाल्ली तर आहाराचे योग्य संतुलन साधता येईल.

3) लेखात असे म्हटले आहे की अँम्लोपेक्टीन ए हा LDL कोलेस्ट्रॉल वाढवणारा घातक पदार्थ केवळ गव्हातच आढळतो. 

*सत्य*-  अँमलोपेक्टीन ए हा स्टार्च चा एक प्रकार असून तो अनेक वनस्पतींमध्ये आढळतो तांदूळ ही त्याला अपवाद नाही.

4) गव्हामध्ये ग्लायडीन हे प्रोटीन  आहे ज्यामुळे अधिक भूक लागते व ते अफू प्रमाणे व्यसन लावू शकते.

*सत्य* – ग्लायडीन हा ग्लूटेन चाच एक प्रकार आहे. ग्लूटेन केवळ गव्हातच असते असे नाही तर ते ओट्स मध्ये ही असते. काही व्यक्तींना ग्लूटेन ची अलर्जी असते त्यामुळे त्यांनि ग्लूटेन असलेले पदार्थ खाल्ले की त्यांना जुलाब लागतात. अशा व्यक्तींच्या खाण्यात नेहमी ग्लूटेन युक्त आहार असल्यास त्यांचे सतत जुलाब होऊन त्यांचे वजन कमी होत जाते. या आजाराला *सिलियाक स्प्रू* असे म्हणतात. केवळ हा आजार असलेल्या व्यक्तींनीच गहू पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक आहे. 

        गंमतीचा भाग म्हणजे जे लोक काही वर्षांपूर्वी गव्हांकुराच्या गुणांचे वारेमाप कौतुक करत होते तेच आज गहू कसा वाईट आहे हे सांगत आहेत. प्रत्येक पदार्थात काही चांगले वाईट गुण असतातच म्हणून माणसाने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये असा प्रॅक्टिकल सल्ला आयुर्वेद देतो. तेव्हा गव्हाच्या *सो कॉल्ड* दुर्गुणांचा फारसा बाऊ न करता आयुर्वेदात सांगितलेले नियम पाळून गव्हाचे पदार्थ खायला हरकत नाही .
©डॉ. पुष्कर वाघ

M D (आयुर्वेद)

पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ

आयुष आयुर्वेद क्लिनिक 

डोंबिवली.

0251 – 2441182

drpushkarwagh@gmail.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s