Ayurved · GarbhaSanskar · Gynaecology · Health

 स्त्री स्वास्थ्यातील वमन

​!!!   स्त्री स्वास्थ्यातील वमन   !!!
वमन – प्रस्तावना

आयुर्वेदात वर्णित पंचकर्मांपैकी एक कर्म म्हणजे वमन. वमि, छर्दन, ऊर्ध्वभाग दोष हरणं इ. याचे पर्याय आहेत. शरीराची विशिष्ट प्रकारे पूर्वतयारी करून (स्नेहन – स्वेदन), औषधयुक्त द्रव्यांनी उलट्या करवणे म्हणजे वमन कर्म होय. 
शोधन म्हणजे काय –

वात – पित्त – कफ ह्या आयुर्वेदोक्त त्रिदोषांपैकी कफदोषावर कार्यकारी चिकित्सा म्हणजे वमन. कफाचे स्थान ऊर्ध्वभाग म्हणजे ‘उर’ हे आहे, तसेच आमाशय हे सुद्धा कफाचे मुलभूत स्थान आहे. शरीरामध्ये रोगोत्पत्ती होण्यासाठी दोष, धातु, मल व विष (विजातीय द्रव्य) हे कारणीभूत आहेत. चिकित्सकाने सर्वप्रथम या विष किंवा विजातीय द्रव्यांचे निर्हरण केले पाहिजे. यालाच शोधन / पंचकर्म म्हणतात.

जवळच्या मार्गाने दोषांचे निर्हरण करणे हा शोधन प्रक्रियेचा सिद्धांत आहे. वमनामुळे पोषक दोषांचे आपोआप शमन होते. वमन हे केवळ रोगावस्थेत दोषांचे निर्हरण करण्यासाठी केले जात नसून स्वस्थ व्यक्तीमध्ये स्वास्थ्यरक्षणासाठी सुद्धा केले जाते.

आता प्रश्न पडतो की वमन आणि वांती (उलटी होणे) यामध्ये काय फरक आहे? तर बघूया . . . . 

• वांती ही जठराला म्हणजेच आमशयला सूज आल्याने होते, तर वमन हे औषध देऊन घडवून आणलेली शोधनक्रिया असते

• वांती झाल्याने तात्पुरते बरे वाटते तर वमनामुळे व्याधीचे समूळ उच्चाटन होते.
वमन कसे करावे –

वमनापुर्वी वर्धमान मात्रेत स्नेहपान केले जाते. वमन हे वाढलेल्या कफ व पित्त दोषांची चिकित्सा आहे पण त्याकरिता शरीराचे बाह्य व अभ्यंतर स्नेहन होणे आवश्यक आहे. अभ्यंतर स्नेहपान करण्यामुळे लीन झालेले दोष सुटे होऊन स्रोतोरोध दूर होतो. वमनाची कार्मुकता स्नेहापानावर अवलंबून असते. ग्रंथात स्नेहापानाच्या वमनयोगात मदनफल, पिप्पली चूर्ण, वचा चूर्ण, यष्टिमधु चूर्ण यांचा समावेश करावा. कारण ही द्रव्ये तीक्ष्ण असून चिकट कफाला बाहेर काढण्यास सहाय्य करतात.

रुग्णाला नेहमीच्या प्राकृत भोजनापर्यंत आणण्याच्या कालावधीपर्यंत काही उपक्रम केले जातात. यांचा अंतर्भाव पश्चात कर्मामध्ये होतो. सर्वप्रथम हात, पाय किंचित गरम पाण्याने धुवून विश्रांती घ्यावी. त्यानंतर धूमपान करावे म्हणजे उर्वरित कफदोषाचे निर्हरण होते. त्यानंतर संपूर्ण संसर्जन क्रमाचे पालन करावे. 
स्नेहपानाचे प्रमाण –

पहिल्या दिवशी ३० मिली

दुसऱ्या दिवशी ६० मिली

तिसऱ्या दिवशी ९० मिली

चौथ्या दिवशी १२० मिली

पाचव्या दिवशी १५० मिली

सहाव्या दिवशी १८० मिली

सातव्या दिवशी २१० मिली
स्नेहपान काळातील आहार स्निग्ध, लघु, उष्ण, अनभिष्यन्दि असावा

स्नेहापानानंतर विश्रांती घ्यावी. आठव्या व नवव्या दिवशी रुग्णास स्नेहन स्वेदन देण्यात यावे.

दहाव्या (विश्रामदिनी) आहार –

काफोत्क्लेश करणारा आहार द्यावा. उदा. ग्राम्य, अनूप, औदक मांसरस (मासे इ.), दूध, दही, उडीद, तीळ व अन्य अभिष्यंदी शाकादि भोजन.

वमनाच्या दिवशी – रिक्त आमाशयात वमन औषधे देऊ नयेत. इशत् स्निग्ध पेया, तूप, दही अथवा दूध द्यावे. 

वासंतिक वमन – पंचकर्मांपैकी वमनाचे कार्य आमाशय या अवयवावर तसेच कफदोषावर होते. कफाचे मुख्य स्थान आमाशय असल्याने अमाशयातील कफाचे शोधन झाल्यास संपूर्ण कफदोषावर विजय मिळवता येतो. मात्रेचा उल्लेख नाही. पण ह्र्सीयसी मात्रेपासून सुरुवात करून स्नेहपान हे ३,५,७ दिवसात दोषांचा ऊर्ध्व किंवा अधो मार्गाने उत्क्लेश करणे हाच असल्याने स्नेहाचे संपूर्ण पाचन होऊ देऊ नये. स्नेहाचे अपचन देखील कारण त्यामुळे गंभीर व्यापद होतात. म्हणून स्नेहाची मात्रा थोडी अधिक असावी म्हणजे उत्क्लेश हे अपेक्षित कार्य घडते.
स्नेहाचे पाचन झाले हे कसे समजावे ?

यासाठी ग्रंथातील खालील श्लोकांचा संदर्भ सापडतो. 

शिरोरुक् भ्रम निष्ठीव मूर्च्छा सादारति क्लमैः l जानीयात् भेषजं जीर्यत् . . . . अ. सं. सू. २५

दोकेदुखी, तोंडाला पाणी येणे, अंग गळून जाणे, बेचैनी इ. पच्यमान स्नेहाची लक्षणे आहेत.
स्नेहाचे पाचन पूर्ण झाल्याची लक्षणे –

जीर्णं तद् शान्ति लाघवात् l अनुलोमोनिल स्वास्थ्यं क्षुत्त्रुष्णोद्गार शुद्धिभिः ll . . . . अ. सं. सू. २५
वरील लक्षणांचे शमन होणे, वाताचे अनुलोमन होणे, भूक व तहान वेळेवर लागणे, उद्गारशुद्धी ही स्नेहाचे पाचन पूर्ण झाल्याची लक्षणे आहेत.

स्नेहपानानंतर अनुपान म्हणून कोष्ण जल प्यावे. त्यामुळे स्नेहाचे पाचन व माळाचे अनुलोमन होते. स्नेहपान काळामध्ये जेव्हां जेव्हां जलपान करावेसे वाटेल तेव्हां करावेसे वाटेल तेव्हां कोष्णच जलपान द्यावे. स्निग्ध मल व स्नेहोद्वेग ही लक्षणे दिसेपर्यंत स्नेहपान सुरु ठेवावे. 
वमनपूर्व दिवशी एक दिवस पूर्वतयारी व विश्रांतीचा समजला जातो. या दिवशी प्रातःकाळी सर्वांगास बाह्यस्नेहन व बाष्पस्वेदन देण्यात येते. वमन कर्मासाठी इक्षुरस, फांट, दुग्ध, तक्र इ. द्रव्यांचा वापर केला जातो. आकंठ पानार्थ यष्टिमधु क्वाथ वापरणे फारच फायदेशीर ठरते. कारण यष्टिमधु वमनोपग असल्याने वमन कार्यास सहाय्यभूत ठरते.

वमनकर्म करतेवेळी रुग्णास जानुतुल्य आसनावर (गुढघ्या इतक्या उंचीच्या खुर्चीवर) बसवावे. हल्ली वमनासाठी बनवलेल्या विशेष खुर्च्या मिळतात. 
शिशिर ऋतूमध्ये शीतता अधिक असल्याने स्वाभाविकतः कफदोषाचा शरीरात संचय होतो. हाच कफदोष वसंत ऋतूमध्ये सूर्यकिरणांच्या उष्णतेने पातळ होतो आणि पाचकाग्नि मंद होऊन प्रतिश्यायादि कफाचे विकार उत्पन्न होतात. म्हणूनच वसंत ऋतूमध्ये कफदोषाला शीघ्रतेने बाहेर काढण्यासाठी वमन अत्यंत उपयुक्त ठरते.
वमनकर्म कोणाला करू नये ?

• हृदयरोगी

• नेत्ररोगी

• भ्रम 

• मुळव्याध ग्रस्त

• वातरोगी

• कृमिग्रस्त

• गर्भवती स्त्री
वमनकर्म कोणाला करावे ?

• नवज्वर 

• अतिसार

• राजयक्ष्मा 

• अजीर्ण

• विषबाधा

• दमा

• कासरोगी

• स्थौल्य

• विसर्प (नागीण)

• शोथरोगी

• कान, नाक आजार

• श्वित्र (पांढरे डाग)

• अपस्मार

• हत्तीपाय (श्लीपद)
स्त्रीरोगांत वमनाचा उपयोग

 चरकानुसार सर्व योनिव्यापदांमध्ये स्नेहन – स्वेदन लारून स्त्रीला मृदु वमनादि पंचकर्म करण्याचा उल्लेख आहे. 

 आर्तवदुष्टीची चिकित्सा सांगतांना आर्तवाची शुद्धी करण्यासाठी वमनादिसर्व शोधन करून मग उत्तरबस्ति करण्याचा निर्देश आहे.

 विशेषतः कफज आर्तवदुष्टीमध्ये मदनफल कषायाने वमन देण्यास सांगितले आहे.

 आर्तवक्षयामध्ये संशोधन व आग्नेय द्रव्यांचा विधिवत प्रयोग सांगितला आहे. 

 डल्हणानुसार आर्तवक्षयामध्ये संशोधनासाठी वमन द्यावे असे वर्णन आढळते. मुळात आर्तवक्षयामध्ये विरेचन दिल्यास पित्ताचा क्षय झाल्याने आर्तवाचा क्षय होतो, म्हणूनच वमन देण्यास सांगितले आहे.

 कफज ग्रंथींमध्ये स्नेहन स्वेदनपूर्वक वमनादि शोधानांचा उल्लेख आहे.

 कफज अर्बुदात रोगाची शुद्धी वमनाने करावी असे सुचविले आहे. 
वमनाचे कार्यकारित्व –

स्वस्थ व्यक्तीमध्ये वमन चिकित्सा निरनिराळ्या ऋतुसंधीकाळी दोषस्थानांना अनुसरून केली जाते. स्वस्थ व्यक्तींना वमन देण्यास वसंत ऋतु (फेब्रुवारी – मार्च) हा सर्वात योग्य काळ आहे. 
म. आ. पोदार रुग्णालयात विशेषतः काश्यप विभागात गेल्यावर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये वासंतिक वमनाचा काळ लक्षात घेऊन ५०हून अधिक रुग्णांना यशस्वीरीत्या वमन दिले. त्यात मुख्यतः वंध्यत्व, PCOD, TORCH संसर्ग, BOH (बॅड ऑबस्टेट्रिक हिस्टरी) अशा अनेकविध रोगांनी पिडीत रुग्णांचा अंतर्भाव होता. या चिकित्सेचा लाभ अनेक दाम्पत्यांनी अनुभवला. त्यापैकी काही रुग्णांचे वंध्यत्व निराकरण झाले. ५० पैकी ६ – ७ रुग्णांना केवळ एवढ्याने गर्भधारणा झाली असेही निदर्शनास आले. 

पंचकर्मातील वमन उपक्रम केल्यानंतर IVF करणाऱ्या रुग्णांना फायदा झाला. पूर्वी अनेकदा IVF अयशस्वी झाल्याचा इतिहास असणाऱ्यांपैकी काहींना सहजगत्या यश मिळाले. त्याचा परिणाम म्हणजे “आम्हालाही वमन करा” असे आपणहून म्हणणारे रुग्ण आमच्याकडे येऊ लागले. यातच आयुर्वेदाच्या यशाचे दर्शन घडते.
वंध्यत्व, TORCH संसर्ग, काष्टार्तव, IVF failure, IUI failure, त्याचप्रमाणे unexplained infertilityइ. रुग्णांमध्ये गेल्या ३० वर्षांपासून मी पंचकर्मातील अनेक उपचारांपैकी वमनकर्म आवर्जून करीत आहे. यात माझ्या माजी विभागप्रमुख डॉ. सुरेखा देवैकर तसेच पदव्युत्तर विद्यार्थी यांचा मोलाचा सहभाग आहे.
म. आ. पोदार रुग्णालयातील पूर्वकर्म मॉडेल तक्ता –

• स्नेहपानापूर्वी – दीपन – पाचन : दि. _ _ _ _ ते _ _ _ _ पर्यंत

स्नेहापानाच्या १ दिवस आधी जेवणाच्यावेळी गरम पातळसर मुगाची खिचडी १ चमचा साजुक तूप घालून खावी. 

• स्नेहपान –

पहिल्या दिवशी ३० मिली घृतपान करून तपासणीला यावे.

 दुसऱ्या दिवशी ६० मिली घृतपान करावे

 तिसऱ्या दिवशी ९० मिली घृतपान करून तपासणीला यावे.

 चौथ्या दिवशी १२० मिली घृतपान करावे

 पाचव्या दिवशी १५० मिली घृतपान करून तपासणीला यावे.

 सहाव्या दिवशी १८० मिली घृतपान करावे

सातव्या दिवशी २१० मिली घृतपान करून तपासणीला यावे.
स्नेहपान काळातील आहार –

ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, पडवळ, दुधीभोपळा, दोडका, घोसावळे, शेवगा, मुळा, कोबी, खोबरे, मुगाची खिचडी
विश्राम दिवशी आहार –

स्निग्धपणा कमी असणारा आहार. उदा. भाजी, भाकरी, मुगाची खिचडी
वमानाच्या पूर्व दिवशीचा आहार –

दही, भात, मधुररसात्मक आहार, बासुंदी, दहीवडा
या रुग्णालयातील ‘विशेष पंचकर्म विभाग’ काश्यप विभागातील दाम्पत्यांच्या सोयीसाठी सदैव तत्पर असतो. गर्भधारणेपूर्वी शरीरशुद्धीसाठी वमनकर्म करणे हे गर्भसंस्कारांमध्ये एक महत्वाचे कर्म आहे. ह्याशिवाय चिकित्सा करणे म्हणजे गर्भसंस्कारांची चिकित्सा अपूर्णच म्हणावी लागेल.
लेखक – 

प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार

आयुर्वेद वाचस्पति,

प्राध्यापक,

स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,

रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय

मुंबई ४०० ०१८

+917738086299

+919819686299

subhashmarlewar@gmail.com
शब्दांकन –

वैद्य अरुण आबासाहेब शिंदे

स्त्रीरोग व प्रसूतितंत्र एम. एस. (स्कॉलर)

पोदार वैद्यक महाविद्यालय, मुंबई

+919922734085

Shindearun10j@gmail.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s