Ayurved

विडा

आयुर्वेद कोश ~ विडा

हल्ली पान खायला गेलं की ‘एक पान द्या ‘ सांगून चालत नाही . पान नक्की कोणते हवे आहे ? साधे ? कलकत्ता ? बनारस ? मघई ? ते झाले की साधे की फुलचंद . . फुलचंद सांगितले की साधे फुलचंद की किमाम वाले ? त्यात सुपारी कच्ची , पक्की की कतरि ? ठंडक घालायची की नाही ? इत्यादी अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरे तयार ठेवावी लागतात . . . हे काहीच नको असेल तर सोप्पा मार्ग म्हणजे ‘१ मसाला ‘ पान द्या . . इतकेच मागायचे ! त्या पानात जिन्नस इतका भरलेला असतो की जेवलेले पचवायला पान खायचे की या चौकात खाल्लेले पान पचवायला पुढच्या चौकात जलजीरा प्यायचा ? असा प्रश्न पडतो . . सांगायचा हेतू इतकाच . . . की तुमचे मसाला , विशेष करून चोकलेट , कोकोनट ,कुल्फी असल्या पानाचा काही उपयोग नाही . . .

आयुर्वेदानुसार तांबुल म्हणजे खाऊ चे पान . . . हे चवीला कडू आणि तिखट असते . कधी नुसते पान तोंडात टाकले तर ही चव व्यवस्थित जाणवते . हे पान गुणाने उष्ण आणि तीक्ष्ण स्वरूपाचे असते . हे पान खाल्ले की मुखात होणारा लालास्राव वाढतो . तसेच हे पान त्यातील घटकांसह चावून खाल्ल्याने जो रस पोटात जातो त्याने अग्नीचे दीपन होते . खाल्लेल्या अन्नाचे पचन होते व अनुलोमन होते . हे पान वात आणि कफाचा नाश करते .  पान हे कमोद्दिपक असल्याने मैथुनाच्या पूर्वी ते खाण्याचा निर्देश आहे .

पान कधी खावे ? याच्या वेळा आठवा – झोपेतून उठल्यावर , अंघोळ केल्यावर , जेवण झाल्यावर , वमन झाल्यावर इत्यादी . . या काळात स्वाभाविक पणे कफाची वृद्धी झालेली असते . सध्या आपण ‘फिंगर बाउल ‘ कल्चर मधले असल्याने जेवण झाल्यावर चूळ भरायचा प्रश्नच येत नाही . त्यामुळे आपण काय जेवलो होतो ? त्याची चव बराच काळ जिभेवर रेंगाळत असते . . त्या चवीचे आपल्या जिभेवर आवरण असते . दुसरा एटीकेट म्हणजे जेवण झाल्यावर ‘डेझर्ट ‘ खाणे . म्हणजे आपण कफाला इतके व्यवस्थित वाढवून ठेवतो की त्याच्या सारखा तोच . . . हल्ली बडीशेप सुद्धा ‘शुगर कोटेड ‘ मिळतात त्यामुळे भोजनोत्तर वाढणाऱ्या कफाला आटोक्यात आणायला आपल्याकडे काही साधनच नाही !!

आयुर्वेद ज्या काळी लिहिला गेला तेव्हा हे फिंगर बाउल , डेझर्ट , शुगर कोटेड बडीशेप वगैरे काही नसले तरी खाल्लेले अन्न व्यवस्थित पचावे . शरीरात कफाची अतिरिक्त वाढ होऊ नये यासाठी भोजनोत्तर , झोपेतून उठल्या नंतर (सुर्योदया पूर्वी उठल्यावर ) इत्यादी काळात विडा योजलेला आहे .

अनेकदा तुम्ही पाहीले असेल  की पान खाणारे लोक पानाचे देठ आणि त्याचे अग्र कापून टाकतात . . असे का करतात माहित आहे ??  पानाच्या पुढच्या बाजूस आयुष्य , मध्ये यश आणि देठाला लक्ष्मी असते . पानाचे देठ खाल्ले असता रोग प्राप्ती होते , अग्र खाल्ले असता पाप लागते , पानाच्या शिरा खाल्ल्या असता बुद्धिभेद होतो असे वर्णन आढळते . या गोष्टी प्रयोगशाळेत सिद्ध करणे शक्य नाही . परंतु परंपरा म्हणून याचे पालन करायला हरकत नाही .

पानात जी सुपारी घातली जाते ती थंड , रुक्ष आणि तुरट असते . ती कफ आणि पित्ताचा नाश करणारी आहे . अग्नीचे दीपन करणारी आहे . तसेच ती कैफ आणणारी आहे . आयुर्वेदानुसार उकडलेली सुपारी (चिकणी ) सुपारी ही उत्तम आहे .

जिच्यामुळे पानाला लाल रंग येतो ती कात कफ आणि पित्त यांचा नाश करते . चुना हा कफ आणि वात यांचा नाश करतो . त्यामुळे चुना आणि कात यांचे मिश्रण हे त्रिदोष नाशक आहे .

आयुर्वेदात सध्या पानात घातले जाणारे खोबरे , गुलकंद , बडीशेप इत्यादी यांचा उल्लेख नाही . विडा  म्हणजे पान + सुपारी +कात + चुना ! त्यात वेलची किंवा लवंग घालायला हरकत नाही . पण चोकलेट पान वगैरे चवीला कितीही उत्तम लागले तरी त्याचा आणि आयुर्वेदोक्त विड्याच्या गुणांचा काही संबंध नाही .

हे पान कसे खावे याबाबत काही नियम आहेत. आयुर्वेदानुसार –

१. पान सेवन केल्यावर ते व्यवस्थित चावून घ्यावे .
२. चावल्या नंतर जो प्रथम रस असतो तो विषासमान असतो त्यामुळे तो गिळू नये .
३. दुसऱ्यांदा जो रस येतो तो पचण्यास कठीण व रेच उत्पन्न करणारा असल्याने तो गिळू नये .

(** येथे गिळू नये म्हणजे तो थुंका असा अर्थ आहे . परंतु स्वच्छतेचे नियम लक्षात घेता रस्त्यावर कोठेही थुंकणे योग्य नाही . त्यामुळे पान पट्टी जवळ जी कचरा कुंडी असते ”त्यातच ” थुंकावे . किंवा ते शक्य नसेल तर प्लास्टिक पिशवी घेऊन त्यात थुंकावे व ती पिशवी नंतर कचरा कुंडीत टाकावी . पान खावून रस्त्यावर किंवा अन्यत्र कोठेही थुंकणे हे मात्र १०० % अयोग्य आहे )

३. तिसरा उत्पन्न झालेला रस हा अमृतासमान असल्याने तो सेवन करावा . म्हणजे यापुढे पान संपे पर्यंत खावे .

असे हे ‘गुणकारी ‘ पान सर्वांनी खावे का ??

पान हे किंचित पित्तकारक असल्याने , पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी जपून खावे . ज्यांचे दात मजबूत नाहीत , तोंडाला सतत कोरड पडते , डोळ्याचे आजार आहेत , राजयक्ष्मा (टीबी ) आहे , व्रण / जखम झाली आहे , दाह- जळजळ होत आहे अशा लोकांनी पान खावू नये . ज्यांना आळस येतो , जिभेचे रोग आहेत , गळ्याचे रोग आहेत , कफाचा त्रास आहे अशा लोकांना पान हितकारक आहे !!

मग उद्यापासून हा लेख दाखवून ‘पानपट्टी ‘ सुरु का ??

अजिबात नाही . . . तांबुलाची प्रशस्ती सांगणारा आयुर्वेद तांबुल अति सेवन करण्याने दृष्टी , केस ,दात , जठराग्नी , शरीराचा वर्ण , बल , यांचा क्षय होतो असे स्पष्टपणे नमूद करतो !!

आयुर्वेदात पान हे ‘व्यसन ‘ म्हणून नाही तर ‘आरोग्य प्रदान ‘ करणारे असे सांगितले आहे . नुसते खाऊचे पान घेतले तरी त्याचे पचन संस्थे पासून ते प्रजनन संस्थे पर्यंत फायदे आहेत . ते हितकारक की अहितकारक हे आपल्या हातात आहे . पानात तंबाखू घालून त्याचे व्यसन लावून घेणे हे सर्वथा वर्ज्य . . . पण खाल्लेले जेवण पचवायला पान खाणे योग्यच !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s